Wednesday, December 12, 2018

रोग व्यवस्थापन

  1. एकात्मिक रोगव्यवस्थापन

डिसेंबर २०१८.

पिकावरील रोगांचे नियंत्रण करण्याचे दोन मार्ग आहेत,
१.रोगांची नियंत्रण योजना 
२.पिकांची नियंत्रण योजना

 रोगांची नियंत्रण योजना म्हणजे पिकांवरील एखाद्या विशीष्ट अशा रोगांचे नियंत्रण करणे
पिकांची नियंत्रण योजना म्हणजे पिकावरील निरनिराळ्या रोगांचे व्यवस्थापन करणे या एकात्मिक रोगाव्यवस्थापन  पद्धतीत प्रमुख रोगांचे पूर्णपणे किंवा बहुतांशी नियंत्रण होईल अशी उपाययोजना करावी लागते. यामुळे रोगानियंत्रनावरील खर्च कमी होऊन शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये पिक संरक्षण योजना करता येते.
पुढील पद्धतीने रोगांचे व्यवस्थापन करावे
अ. स्वच्छता मोहीम राबविणे : 

१. रोगजंतूंच्या प्रवेशास प्रतिबंध करणे

      देशामध्ये एखाद्या रोगजंतूचा प्रवेश लवकर होऊ नये म्हणून सरकारने कायदा केला आहे त्यासाठी सरकारच्या काही संस्था याबाबतचे सनियंत्रण करतात. अशा संस्था परदेशातून येणाऱ्या बियाण्याचे किंवा वनस्पतींचे निरीक्षण करतात. वनस्पतींमध्ये रोगजंतू आढळून आले की ते  बी किंवा वनस्पती पूर्णपणे नष्ट करतात. या संस्था देशात विशिष्ट पिकांचा ठराविक वान पूर्णपणे किंवा ठराविक हंगामात घेण्यास मनाई करू शकतात.

२.निरोगी बियाण्याचा वापर 

    पेराणीसाठी प्रमाणित बियाणे वापरावे, बियाणे रोगजंतू मुक्त असावे. जर बियाणे रोगजंतूमुक्त असेल तर त्यावर बुरशीनाशकांचे संस्कार करावेत; काही रोगजंतू बियांच्या आतील भागात असतील तर अशा बियाण्यावर अंतरप्रवाही बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी किंवा त्यावर गरम पाण्याची प्रक्रिया करावी.

३.रोगजंतूंचा नायनाट करणे 

 पिक काढणीनंतर जमिनीत राहिलेले त्यांचे काही भाग रोगजंतूचे घर बनून राहतात. पिकांचे हे भाग जमिनीतून काढून नष्ट करावेत किंवा जाळून टाकावेत, त्यामुळे रोगजंतूंचा नाश होतो. 

४.तणांचा नायनाट करावा

      शेतात मुख्य पिक सोडून काही वनस्पती ठराविक रोगाजंतूचे घर बनून राहतात. शेतातून तसेच शेजारच्या शेतातूनही अशा वनस्पती काढून त्यांचा नाश करावा.

५.वनस्पतीला होणाऱ्या जखमा टाळाव्यात 

       वनस्पतींच्या पृष्ठभागावर होणाऱ्या लहानसहान जखमा टाळाव्यात कारण त्यामधून रोगजंतूंचा शिरकाव होतो. निरनिराळ्या बुरशिंचे बीजाणू आणि जीवाणूंचा वनस्पतींमध्ये शिरकाव वनस्पतीच्या जखमामधून होतो. वनस्पतींचा पृष्ठभाग जेंव्हा ओला असतो; तेंव्हा वनस्पतीची छाटणी, फळांची तोडणी किंवा त्यामधून चालने हि कामे शक्यतो टाळावीत. वनस्पतींची छाटणी केल्यानंतर किंवा रोगट भाग काढल्यानंतर झालेल्या जखमेवर बुरशीनाशकाची पेस्ट  लावावी.

६.निर्जंकीकरण करणे 

   झाडांची छाटणी करतांना चाकू किंवा इतर हत्यारे रोगट झाडापासून निरोगी झाडापर्यंत जीवाणू किंवा बुरशीचे बीजाणू वाहून नेतात. अशावेळी प्रत्येक झाडाची छाटणी झाल्यानंतर चाकू किंवा सिकेटर फॉरमॉल्डीहाईड किंवा आयोडीनच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करून घेणे आवश्यक असते.

ब. मशागतीचे तंत्र अवलंबिणे

    मशागतीच्या तंत्रामुळे वनस्पतीच्या भोवतालाच्या वातावरणात काही प्रमानात बदल घडून येतात आणि त्यामुळे रोगजंतूंच्या वाढीला अटकाव येतो

१.योग्य जमिनीची निवड करणे

       ज्या जमिनीत एखाद्या रोगांचे रोगजंतू आहेत अशा जमिनीची निवड त्या रोगांना बळी पडणाऱ्या पिकांसाठी करू नये.  काही रोगजंतूंचे नाते ठराविक जमिनीशी निगडीत असते

२.योग्य पिकांची निवड करणे   

       जी पिके ठराविक वातारणात समरस झालेली आहेत अशी पिके रोगांना बळी पडतात याउलट अशा भागात नवीन पिके घेतली तर रोगांना अधिक प्रमाणात बळी पडतात. अशा भागात नवीन पिके घ्यायची झाल्यास छोट्या प्रमाणात चाचणी घेऊन नंतरच अशा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करावी.

३.रासायनिक खतांचा वापर 

      या खतांच्या वापरामुळे वनस्पतींची वाढ जोरदार होते त्यामुळे वनस्पती रोगांना समर्थपणे तोंड देतात. अशा ठिकाणी रोगांची तीव्रता कमी राहते. खतामुळे जमिनीचा सामू बदलतो. त्यामुळे काही रोगजंतूचे नियंत्रण होते.
उदा.  Potato scab, मुळकुज ह्या रोगाची तीव्रता अल्कली जमिनीत जास्त असते तर कोबीवर्गीय पिकांचा क्लबरूट व फ्युजेरीयम हे रोग आम्लयुक्त जमिनीत जास्तप्रमाणात आढळतात.

४.हिरवळीच्या खतांचा वापर

   हिरवळीच्या खतांचा वापर केल्यामुळे रोगजंतूंचे जैविक नियंत्रण होऊ शकते. हिरवळीच्या खतामुळे जमिनीत    परोपजीवी अशा उपयुक्त सूक्ष्मजंतूंची वाढ मोठ्याप्रमाणावर होते;परंतु  हिरवळीचे खते पिक पेराणीच्याअगोदर १ महिना जमिनीत गाडली पाहिजेत. हिरवळीच्या खतांचा भरपूर प्रमाणात वापर केल्यास बटाट्याचा Scrab  ह्या रोगांचे नियंत्रण होते.

५.पाण्याचे व्यवस्थापन

      पिकांच्या वाढीसाठी चांगल्या निचऱ्याच्या जमिनीची आवश्यकता असते. जमिनीत जादा ओलावा टिकून राहिला तर जमिनीत ठराविक रोगाजतूंची वाढ होत नाही व जमिनीतील रोगजंतू वनस्पतीवर हल्ला करतात.

६.पिकांच्या हंगामी निवड

       काहीवेळा रोग उशिरा येतात त्यामुळे लवकर पेरणी केल्यामुळे ते पिक रोगाच्या तावडीतून सुटू शकते. पिकाच्या काढनीचे नियोजन हे कोरड्या हवामानात करायला हवे. पुढे साठवाणीमध्ये पिक भिजल्याने काही प्रश्न निर्माण होतात.

७.पिक काढणी पद्धत  

     अन्नधान्यातील साठवणीचे रोग टाळण्यासाठी पिकांची काढणी कोरड्या हवामानात करावी. पिक काढल्यानंतर अन्नधान्य शक्यतो चांगले वाळवूनसाठवून ठेवावे, कारण साठवणीत Aspergillus नावाची बुरशी अल्फाटोक्सिन नावाचा विषारी पदार्थ अन्नधान्यामध्ये तयार करते. त्या विषाचे माणसावर आणि इतर प्राण्यावर अनिष्टपरिणाम होतात.

८.पिकांची फेरपालट 

     ठराविक रोगाला बळी पडणारी पिके त्या रोगाची रोगजंतू वाढविण्यासाठी पोषक ठरतात. पिक काढणीनंतर त्या रोगांचे रोगजंतू वाढवण्यास पोषक ठरतात. पिक काढणीनंतर त्या रोगांचे रोगजंतू जमिनीत राहतात. अशा रोगजंतूचे प्रमाण प्रमाण कमी करण्यासाठी १-२ हंगामात त्या रोगाला बळी न पडणारी इतर पिके घ्यावीत.

९.जमीन पडीक ठेवणे

    जमीन स्वच्छ करून त्या हंगामात पिक न घेणे म्हणजे जमीन पडीक ठेवणे होय. त्यामुळे जमिनीतील रोगजंतूचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते. काही रोगजंतूच्या बाबतीत पडीक जमिनीची ठराविक काळानंतर नांगरणी करतात. उदा. सुडोमोनास, सोल्यानिसिरम या जीवणूंचे नियंत्रण जमीन पडीक ठेवून करता येते.

१०.शेतामध्ये योग्य प्रकारची सावली ठेवणे

शेतात काही प्रमाणात सावली ठेवल्यामुळे ठारवीक रोगांचे प्रमाण कमी होते. उदा. कॉफीवरील सरकोस्पोरा तसेच सावलीमुळे ऑईलपाम रोपात्यावरील करपा रोगांचे चांगले नियंत्रण होते.

११.सूर्याच्या उष्णतेने जमिनीचे निर्जंतुकीकरण करणे 

जमीन ओली करून प्लास्टिकच्या कापडाने दोन आठवडे झाकून ठेवावी. त्यामुळे जमिनीच्या वरच्या थरातील तापमान वाहून बरेचसे रोगजंतू मारले जातात.

१२.रोग प्रतिकारक जातींचा वापर करणे 

सर्वात परिणामकारक साधी आर्थिकदृष्ट्या परवडणारी रोगनियंत्रनाची पद्धत म्हणजे रोगप्रतिकारक जातींचा वापर करणे ही होय.रोगांना बळी न पडणाऱ्या जातींचा वापर केल्यामुळे काही रोगजंतूची तीव्रता कमी होते. पुष्कळवेळा पिकांच्या रोगांना बळी न पडणाऱ्या जाती विकसित करणे तात्कालिन उपाययोजना करण्यासारखे आहे कारण कालानुरूप रोगजंतूंमध्ये नवीन जाती प्रजाती निर्माण होत असतात. आणि नवीन पिकांच्या जाती त्यांना बळी पडत असतात.

जैविक नियंत्रण तंत्राचा वापर करणे 

एक प्रकारच्या रोगजंतूचा वापर करून दुसर्‍या रोगजंतूचा नाश करणे होय. जमिनीमधील प्रतिस्पर्धी रोगजंतूना सोडून जमिनीतील निराळ्या रोगजंतूंचे नियंत्रण करता येते. उदा.  ट्रायकोडर्मा व्हीरिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम  या बुरशीमुळे मोसंबीवरील रायझोक्टोनीया नावच्या रोगजंतूचे नियंत्रण होते. तसेच वरील प्रतिस्पर्धी रोगजंतुमुळे अमेरिकेतील भुईमूगवरील स्केलेरेशियम शेलफिसी आणि रशियामध्ये कपाशीवरील फ्यूजरियम ओक्सिस्पोरीम या रोगजंतूचे नियंत्रण होते.

जमिनीवर संस्कार करणे 

जमीनीवरील रोगजंतूचा नायनाट करणे किवा त्यांना निष्क्रिय करणे हा असतो. रसायने , उष्णता , जमिनीत पाणी साठवणे आणि जमिनी पडीक ठेवणे इत्यादि गोष्टींचा समावेश होतो.
रसायनचा संस्कार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ठराविक बुरशींनाशकाची भुकटी जमिनीमध्ये पेरणीच्या आगोदर घालवत तसेच जमिनीत वाफ तयार करणारी रसायने पेरणीच्या अगोदर काही आठवडे घालतात आलीकडे काही दानेदार रसायने  मिळू लागू लागली आहेत. ती उभ्या पिकात टाकता येतात. रसायनाचे संस्कार करण्याची पद्धत फारच खर्चिक असल्यामुळे नर्सरीतील रोपाना, लहान शेतात आणि नगदी पिकांना ही पद्धत वापरतात. या पद्धतीमुळे बटाट्यावरील काळा स्कर्फ, भाजीपल्याचे सूत्रकृमी आणि फळ झाडांना होणारे जमिनीतील रोगांचा बंदोबस्त करता येतो. उष्णतेचा उपयोग कुंड्या, नर्सरी, आणि काचगृहे यांच्यातीलच रोगजंतूच निर्मूलन करण्यासाठी करतात. जमिनीमध्ये पिकांच्या मुळ्या, धसकटे, पालापाचोळा जाळून जमिनीला ऊब देतात. बर्‍याच देशात वाफेचा उपयोग जमीन निर्जंतुक करण्यासाठी करतात.

वनस्पतीच्या रोगट भागावर उष्णता आणि रसायनचा संस्कार करणे.

वनस्पतीवर किंवा वनस्पतीत असलेले रोगजंतु उष्णता आणि रसायनची प्रक्रिया करून निष्क्रिय बनविता येतात. याचा उपयोग फक्त फळझाडवरील रोगांच्या निर्मूलनासाठी करण्यात येतो. या पद्धतीमुळे वनस्पतीच्या भागावर वाढलेले रोग जंतु किंवा वनस्पतीच्या आतमधील भागात झालेली वाढ याचा बंदोबस्त करता येतो.

प्रा. प्रेरणा भास्कर अभंग, कु. सौरभ सुभाष केदार
 (कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी)
9923102068,9112775875