Monday, February 10, 2020

टोमॅटो पिक व्यवस्थापन



  टोमॅटो हे आहारदृष्ट्या आरोग्यासाठी उपयुक्त असून तसेच भाजी आणि प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठी वापरले जातात. टोमॅटो हे पिक जगात बटाटाच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिक बनले असून नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली या जिल्ह्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड मोठ्याप्रमाणावर केली जाते.
  टोमॅटोतील लायकोपीन या घटकामुळे शरीरातील पेशी मारण्याचे प्रमाण कमी होते. टोमॅटो या पिकावर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.या पिकांची योग्य काळजी घेतल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि हातचे पीक वाया जाण्याची शक्यता असते. त्यासाठी वेळीच उपाय गरजेचे आहे. टोमॅटो या पिकावर विषाणूजन्य,जिवानुजन्य,बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगावर योग्य ते नियंत्रण केल्यास पिकांचे होणारे नुकसान टाळता येते.
लागवड करताना घ्यावयाची काळजी :
     टोमॅटो या पिकास उष्ण, कोरडे, कमी आर्द्रता अशाप्रकारचे हवामानाची आवश्यकता असते, १८ ते ३० डिग्री तापमानाला पिक चांगले येते.परंतु १५ डिग्री तापमानापेक्षा कमी तापमानामध्ये झाडाची वाढ खुंटते तर ३६ डिग्री पेक्षा जास्त तापमानामुळे फलधारणा होत नाही, फलधारणेसाठी २५ ते ३० डिग्री तापमान आवश्यक असते.
जमीन :
जमीन ही चांगली निचरा असणारी, मध्यम काळी पोयट्याची असावी. हलक्या जमिनीत पिक लवकर निघते, भारी जमिनीत थोडे उशिरा निघते. जमिनीचा सामू ६ ते ७.५ असावा. पिक घेण्यापूर्वी सामवर्गीय पिके घेतलेली नसावीत.
आंतर:
९० सेंटीमीटर २ सरीमधील आंतर ठेवून दोन पिकामधील आंतर ३० सेंटीमीटर ठेवावे.
बीजप्रक्रिया:
बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम ३ ग्राम, ट्रायकोडर्मा २.५ ग्राम प्रती किलो बियाण्यास चोळावे, त्यामुळे रोपे कोलमडणे, मुळकुज, मररोग नियंत्रणात राहतात.
रोपे तयार करतांना १२५ ग्राम संकरीत वाणासाठी आणि ४०० ग्राम सुधारित वाण बियाणे १ हेक्टरसाठी ३ गुंठेमध्ये लावावे. १ सेंटीमीटरवर १ बी लावून १२ दिवसानंतर २५ ते ३० ग्राम फोरेट वाफ्यात टाकावे. ३ ते ५ आठवड्यानंतर पुनर्लागवड करावी.
ट्रे पद्धती वाहतुकीसाठी सोयीस्कर असून ही पोसेर्ट ट्रे मध्ये करतात. १ ट्रेसाठी १.२५ किलो कोकोपीट लागते. यामुळे बियाणे वाया जात नाही.
रोपे लागवड
रोपे हे ओलावा असलेल्या जमिनीत लावावीत. रोपे कॅर्बोसुल्फान किंवा कॅर्बेंडझिम १० ग्राम प्रती लिटर पाण्यात बुडवून लावावी. २ ते ३ दिवसांनी अंववणीचे पाणी द्यावे.
खत व्यवस्थापण 
शेंद्रीय : प्रती हेक्टरी २० टन कुजलेले शेणखत मिसळावे. २०० किलो निंबोळी पेंड मिसळावी.
जैविक: २ किलो अझाटोबेक्टोर २ किलो स्पुरद विरघळणारे आणि २ किलो पालाश विरघळणारे जीवाणू, १ टन शेणखतात मिसळून द्यावे.
रासायनिक खते:
संकरीत वाणासाठी – ३०० किलो नत्र, १५० किलो स्पुरद आणि पालाश प्रती हेक्टरी वापरावे.
सुधारित वाणांसाठी – २०० किलो नत्र, १०० किलो स्पुरद आणि १०० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. आणि राहिलेले निम्मे नत्र ३ समान मात्रामध्ये २० दिवसाच्या अंतराने द्यावे.
पाणी व्यवस्थापन:  हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी, उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसाने तर पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
तणनाशक : पेंडीमेथालीन ८ ते १० दिवस लागवडीपूर्वी फवारावे.  
टोमॅटो पिकावरील रोग:

अ.   जिवानुजन्य रोग
   मर रोग
      लक्षणे :
यामध्ये झाडांची पाने सुकल्यासारखी वाटतात. नंतर संपूर्ण झाडच सुकते. तसेच ज्या जमिनीचा सामू कमी आहे अशा जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. खोडवर जमिनीच्या वरच्या भागावर मुळे फुटलेली दिसतात. अशा झाडांचे खोडे आडवे कापल्यास त्यातून पांढरा स्त्राव बाहेर पडतो.
व्यवस्थापन :
·         रोगप्रतिबंधक वाणांचा वापर करावा
·            पिकांची फेरपलाट करावी

आ. बुरशीजन्य रोग

१.      करपा
लक्षणे:
 हा रोग झाडांच्या वाढीच्या कोणत्याही अवस्थेत आढळून येतो. यात झाडांची पाने, देठ, खोड यावर तपकिरी गुलाबी रंगाचे एककेंद्री गोलाकार ठिपके पडतात हवेतील अद्रता वाढल्यास ठिपक्यांचे प्रमाण आकारमान वाढते संपूर्ण पाने करपतात. तसेच फळावर आणि फांदीवर काळे ठिपके दिसतात.
व्यवस्थापन :
·         रोगरहित फळे बियांसाठी वापरावीत
·         पेरणीपुर्वी बियण्यांना बुरशींनाशकाची - ग्रॅम प्रतिकिलो बी याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
·         मॅन्कोसेब ७५% २५ ग्रॅम किंवा कार्बोन्डोंझिम ५०% १० ग्रॅम किंवा प्रती १० लीटर पाण्यात मिसळून दर १५ दिवसांनी फवारणी करावी.
२.      रोपे कोलमडणे
लक्षणे  
हा रोग रोपवाटिकेत जास्त प्रमाणात आढळून येतो. हा रोग जमिनीत वाढणार्या बुरशीमुळे होतो. या रोगांचे जंतु बियांसोबत आढळतात. बी पेरल्यानंतर उगवल्यानंतर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास बी मरते. बियांपासून येणारा अंकुर कुजतो आणि बर्याचवेळा रोप उगवून आल्यावर रोगांची लक्षणे दिसतात. अशी रोपे कोलमडतात आणि मरतात.
व्यवस्थापन :
·         रोगग्रस्थ झाडांचे अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.
·         पिकांची फेरपलात करावी
·         पेरणीपुर्वी प्रतिकिलो बियाण्यास - ग्रॅम थायमर किंवा बावीस्टीनची बिजप्रक्रिया करावी.
·         मुळाभोवती फार काळ पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

इ.      विषाणूंजन्य रोग

१.      बोकड्या(लीफ कर्ल)
लक्षणे :
या रोगाचा प्रसार पांढरी माशी या कीडीमुळे होतो, पाने चुरगळल्यासारखी दिसतात, पानांचे गुच्छ किंवा झुपके तयार होतात. पानांच्या शिरा पिवळ्या पडतात.
व्यवस्थापन :
·         रोगग्रस्त झाडे उलटून नष्ट करावीत.   
·         फोस्पोमिडोण ८५% . मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२.     स्पॉटेड विल्ट व्हायरस
लक्षणे:
पानावर काळे, तांबडे गोल ठिपके, ठिपक्यात अनेक वर्तुळे दिसतात. नंतर संपूर्ण पाने काळे पडतात. वाळून जातात. ठिपक्यांमुळे फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात. पिकण्याची क्रिया पूर्ण होत नाही. उन्हाळी आणि खरीप हंगामात या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
व्यवस्थापन:
रोपवाटिकेत लगवडीनंतर कार्बोफ्युरोन किंवा थिमेट यासारख्या कीटकनाशकचा वापर करावा. रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत
         
टोमॅटो पिकावरील किडी:
फळे पोखरणारी आळी :  
ही आळी पाने खाते नंतर हिरवी किंवा पिकलेली फळे पोखरून आत शिरते.
नियंत्रण :
·       क़्युनोलफॉस २० मिलीलीटर प्रती लिटर प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
·       HaNPV २० मिली  प्रती २०० लिटर पाण्यातून संध्याकाळी फवारावे.
·       डायमिथोइट, मिथिल डीमिथोन १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नागआळी: 
ही आळी पानाच्या पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडत पुढे सरकते, ती जशी पुढे तशा पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात यामुळे पानाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया घटते.
नियंत्रण :
·       अशी पाने काढून टाकावीत.
·       डायमिथोइट, मिथिल डीमिथोन १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून रेघांवर फावारावे.
·       रोपांची मुळे इमिद्क्लोप्रद ५ मिली प्रती १० लिटर पाणी या द्रावणात आर्धा तास भिजवून मग लागवड            करावी.
·       नायलॉन नेट मच्छरदानीप्रमाणे गाडीवाफ्यास लावावे.
·       ४% निंबोळी अर्काच्या २ ते ३ फवारण्या घ्याव्यात. अबमेकटीन ४ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रस शोषणाऱ्या आळ्या (मावा, तुडतुडे,पांढरी पाशी):
या आळ्या पानातील रस शोषतात त्यामुळे पानाची अन्न निर्मिती प्रक्रिया खुंटते. पाने पिवळी पडतात.या आळ्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.
नियंत्रण:
·       रोपे लागवडीपूर्वी इमीदक्लोप्रद ५ मिली प्रती १० लिटर द्रावणात अर्धा तास भिजवून मग लावावी.
·       निंबोळी अर्क ५% किंवा निंबोळी तेल २० मिली प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.
·       कामगंध सापळे वापरावेत.