Wednesday, March 25, 2020

कोरोनाचं युद्ध जिंकूच पण त्यासाठी जागरूक रहा..

       कोविड -१९ विषाणू वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करतो. कोविड -१९ हा श्वसन रोग आहे आणि बहुतेक संक्रमित लोकामध्ये सौम्य ते मध्यम लक्षणे विकसित होतात आणि विशेष उपचार न घेता बरे होतात. ज्या लोकांवर मुलभूत वैद्यकीय उपचार चालू आहेत  आणि ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना गंभीर रोग आणि मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोरोना विषाणू रोग (कोविड -१९) लक्षणे: 
  1.  ताप 
  2.  थकवा  
  3.  कोरडा खोकला
  4.  धाप लागणे
  5. ठणका व वेदना
  6. घसा खवखवणे
  7. फारच थोड्या लोकांना अतिसार, मळमळ किंवा वाहणारे नाक, हेही लक्षणे दिसून येतात. 
      निरोगी असलेल्या अन्यथा सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वतःचे विलगीकरण करावे. चाचणीच्या सल्ल्यासाठी त्यांच्या वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या किंवा कोव्हीड-१९  माहिती आणि मदत कक्षाशी  संपर्क साधा. ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास अडचण असलेल्यांनी डॉक्टरांना कॉल करुन वैद्यकीय मदत घ्यावी.

कोविड -१९ संसर्ग कसा होतो: 
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते कोरोना विषाणू हा प्राण्यांतून मानवांमध्ये पसरला आहे .परंतु सध्यातरी कोरोना हा विषाणू माणसापासून माणसापर्यंत पसरत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एखाद्याशी संपर्क झाला, तर लगेचच दुसऱ्या व्यक्तीला ही कोरोनाची लागन होते.
  कोविड -१९ ची लागण झालेल्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेद्वारे  नाक किंवा तोंडातून लहान थेंब बाहेर पडून  हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. हे छोट छोटे कण व्यक्तीच्या सभोवतालच्या वस्तू आणि पृष्ठभागावर चिकटतात. इतर लोकांचा या वस्तू किंवा पृष्ठभागास स्पर्श होऊन, नंतर डोळे, नाक किंवा तोंड या अवयवांना स्पर्श झाल्यास कोविड -१९ संक्रमित होतो.

कोविड -१९ संसर्ग रोखण्यासाठीच आणि प्रसार कमी करण्यासाठी पुढील गोष्टी करा:
  1. आपले हात साबणाने आणि पाण्याने नियमितपणे धुण्यामुळे आपल्या हातात असलेले विषाणू नष्ट होतात.
  2. कोणी खोकत किंवा शिंकत असल्यास त्याच्यापासून कमीतकमी १ मीटर अंतर ठेवा. कारण जेव्हा व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकेद्वारे  नाक किंवा तोंडातून लहान थेंब बाहेर पडून  हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. 
  3.  चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळा कारण हात बर्‍याच पृष्ठभागास स्पर्श करतात आणि विषाणू हाताला चिकटतात. एकदा दूषित झाल्यास हातांनी विषाणूचे डोळे, नाक किंवा तोंडात संक्रमण करून आजार होतो.
  4.  खोकतांना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवा. कारण . कारण लागण झालेल्या व्यक्तींकडून छोट छोटे कण व्यक्तीच्या सभोवतालच्या वस्तू आणि पृष्ठभागावर चिकटतात. इतर लोकांचा या वस्तू किंवा पृष्ठभागास स्पर्श होऊन, नंतर डोळे, नाक किंवा तोंड या अवयवांना स्पर्श झाल्यास कोविड -१९ संक्रमित होतो.
  5. अस्वस्थ वाटत असल्यास घरी रहा. कारण आपल्या भागातील परिस्थितीविषयी राष्ट्रीय आणि स्थानिक अधिकाऱ्याकडे अद्ययावत माहिती असेल. आगाऊ कॉल केल्यास आपल्या आरोग्य सेवा प्रदात्यास त्वरित आपल्याला योग्य आरोग्य सुविधेत निर्देशित करण्याची परवानगी मिळेल. हे आपले संरक्षण देखील करेल आणि व्हायरस आणि इतर संसर्गाचा फैलाव रोखण्यास मदत करेल.
  6. धूम्रपान आणि फुफ्फुसाला कमकुवत करणार्‍या गोष्टी टाळा.
  7. अनावश्यक प्रवास टाळून आणि लोकांच्या मोठ्या समुहांपासून दूर राहून शारीरिक अंतराचा (सोशियल डीस्टन्स) सराव करा.

सौरभ सुभाष केदार
 पाथर्डी, अहमदनगर.
९११२७७५८७५

Saturday, March 14, 2020

फळे काढणी नंतरची प्रक्रिया

      फळांची काढणी करणे, प्रतवारी करणे, फळांची बांधणी करून विक्री करणे या सर्व गोष्टी उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने महत्वाच्या ठरतात.फळांचे उत्पन्न चांगले येऊनही या बाबी निट झाल्या नाहीत तर उत्पादन मिळूनही नुकसानाला सामोरे जावे लागते.  

     झाडावरून पिकाची काढणी करण्यापूर्वी फळांच्या परिपक्वतेचे मानदंड समजून घेणे आवश्यक असल्यावर केलेली काढणी फादेशीर असते.फळांना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही, ती एकमेकांना घासणार नाहीत, अथवा दाबली,खरचटली, फुटली जाणार नाहीत ही काळजी घेत काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. काढणी नंतर फळे सावलीत टोपली किंवा क्रेट्समधून एकत्र करावीत.यानंतर फळांची रंग, आकारमान, वजन, आकर्षकता, जात आणि बाजारपेठेप्रमाणे प्रतवारी करून घ्यावी. फळांची पाकिंग करतांना पाकिंगचे साहित्य हाताळायला सोपे, मजबूत, स्वस्त आणि फळांना वाहतूक, विक्रीदरम्यान साठवणीच्या वेळी संरक्षक असावे.

फळांची काढणी

    फळधारणा झाल्यानंतर फळे वाढत जातात आणि अखेरीस पक्व होतात. फळे पक्व झाले की ती झाडावरून गळून पडतात.  फळे गळून पडण्यापूर्वी त्याची काढणी करणे आवश्यक असते. पक्व झालेले फळ झाडापासून वेगळे करणे याला फळांची काढणी किवा तोडणी म्हणतात.

     फळाची काढणी योग्य वेळी आणि ठराविक पक्वतेच्या अवस्थेत करणे आवश्यक असते. अपक्व फळे काढली तर निट पिकात नाहीत, आणि त्याची योग्य चवही लागत नाही. तसेच योग्य अवस्था उलटून गेल्यावर फळांची काढणी केली तरीही फळांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतात,म्हणून योग्य वेळी फळांची काढणी करावी. काही फळे झाडांवरच पिकतात आणि काढणीनंतर पिकत नाहीत, अशी फळे झाडावरच पिकू द्यावीत. फळे योग्य अवस्थेत झाडावर पिकू द्यावी लागतात. फळे पक्व होवू काढण्यास योग्य झाली की नाही हे ठराविक लक्षणावरून किंवा चाचणी घेवून ठरवावे लागते. याउलट जि फळे झाडावरून काढून नंतर पिकवली जातात, अशी फळे ठराविक अवस्थेतपण पूर्ण पिकाण्यागोदर झाडावरून  काढून घ्यावी लागतात.

     फळे काढण्याची अवस्था ही अनेक लक्षणावरून ओळखता येते. फळाच्या बाहेरील रंगामध्ये बदल घडून येतो.फळांची वाढ होत असतांना फळांचा रंग हिरवा असतो.फळे पक्व होत असतांना हा रंग पिवळा, लाल किंवा काळसर बनतो. रंगामध्ये बदल दिसू लागला कि फळांची पक्व होण्याची अवस्था जवळ आल्याचे समजते.त्याचबरोबर आकारमानात स्थिरता येते.वनस्पतींच्या शरीरामधील महत्वाची रासायनिक प्रक्रिया घडत असतात, फळांच्या गरामधील साखरेचे प्रमाण वाढते आणि अम्लतेचे प्रमाण कमी होते,त्यामुळे फळांचा कडकपणा कमी होऊन ती नरम होऊ लागतात. निरनिराळ्या फळांमध्ये त्यांची काढणी करण्याची आणि त्यांचे लक्षणे ध्यानात घेऊन, काढणीचे काम वेळेवर करावे.

  फळधारण झाल्यापासून ते फळपक्वता येण्यासाठी लागणाऱ्या कालावधी ठराविक फळांमध्ये आणि ठराविक हवामानात ठराविकच असतो.या सर्व बाबींचा अभ्यास करून फळांची काढणी करावी. फळांना कुठल्याही प्रकारे इजा होणार नाही, ती एकमेकांना घासणार नाहीत, अथवा दाबली,खरचटली, फुटली जाणार नाहीत ही काळजी घेत काढणी सकाळी किंवा सायंकाळी म्हणजे कडक ऊन नसताना करावी.

फळांची वर्गवारी/प्रतवारी
 

   काढणी केल्यानंतर फळांची प्रतवारी करणे अत्यावश्यक आहे. खराब, किडलेली, नसलेली, फुटलेली, खरचटलेली, दबलेली फळे चांगल्या फळांपासून वेगळी करावीत. आकारमानाने वेडीवाकडी असलेली फळेसुद्धा वेगळी करावीत. त्यानंतर चांगल्या फळांमधून आकारमान,रंग,वजन, जाती आकर्षकता आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन फळांची प्रतवारी करावी. (प्रथम) ग्रेडची मोठ्या आकाराची आकर्षक फळे मोठ्या आणि दूरच्या बाजारपेठेसाठी पाठवावीत. बी (द्वितीय) ग्रेडची फळे स्थानिक आणि इतर बाजारपेठेसाठी पाठवावीत. जी फळे पिकण्यास सुरुवात झाली असून किंवा फळांची नासाडी व्हायला सुरुवात झाली आहे अशी फळे प्रक्रिया उद्योगांसाठी पाठवावीत आणि अशाप्रकारची प्रतवारी करावी.

   फळांच्या प्रतवारी केल्याने फळांची बांधणी करणे सोपे जाते, फळांच्या विक्रीसाठी सुलभता येते, फळांच्या विक्रीदरम्यान मोठ्याप्रमाणात दर मिळण्याची खात्री मिळते अशाप्रकारचे फायदे लक्षात येतात म्हणून प्रतवारी/ग्रेडिंग करावी.  



फळांची पॅकिंग

      फळे नाशवंत असतात. फळे झाडावरून काढल्यानंतर ती फार काळ टिकत नाहीत. तसेच बहुतेक फळे नाजूक असतात. फळे काढल्यानंतर ठराविक वेळेनंतर त्याची चव, गोडी यात बदल होतो. फळे खराब होण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी फळांची विक्री लवकरात लवकर करणे आवश्यक असते. फळे विक्रीस पाठविताना त्यांची पॅकिंग करणे आवश्यक असते. फळे विक्रीसाठी पाठवतांना त्यांची पॅकिंग करणे आवश्यक असते.यास पॅकिंग असे म्हणतात. फळांची पॅकिंग करणे हे एक शास्त्र तसेच कलाही आहे. फळांची पॅकिंग करतांना काही महत्वाच्या बाबी आहेत,

१.    पॅकिंग सुबक आणि आकर्षक असावी.

२.    पॅकिंग टिकवू आणि आटोपशीर असावी.

३.    पॅकिंग सारखी आणि रास्त असावी.

      पॅकिंग करण्याचे काम सुटसुटीत आणि वेळेवर पूर्ण व्हायला हवे. फळाची वर्गवारी पूर्ण करून पॅकिंग करावी. पॅकिंग नंतर फळांची गुणवत्ता बिघडणार नाही अशी काळजी घेणे आवश्यक असते.

   पॅकिंग करण्यासाठीची अनेक साधनांचा, साहित्यांचा वापर केला जातो. बांबूच्या पाट्या, कागदी  खोकी, पोलीथिन पिशव्या, पोती,  इत्यादी साधनाचा वापर केला जातो.

फळांची साठवण

   फळांची काढणी केल्यानंतर, त्यांची विक्री होईपर्यंतच्या मधल्या काळात फळांची साठवण करणे आवश्यक असते. वेगवेगळ्या फळांत साठवण कमीअधिक काळासाठी केली जाते. फळबागेजवळ अशी साठवणीची व्यवस्था नसेल तर ती फळविक्रीच्या ठिकाणी केली जाते. फालंची साठवण व्यवस्था फळबागायतदारांना करणे अवघड असते. तेव्हा ही व्यवस्था फळांचे व्यापारी अथवा इतरांकडूनही करता येते. फळबागांची लागवड विखुरलेली असते, तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा, शीतगृहाची उपलब्धता नसते: म्हणून फळांची साठवण करण्याची व्यवस्था विक्रीच्या ठिकाणी मोठ्या शहरामधून करणे शक्य होते. फळांची काढणी केल्यानंतर शीतगृहात फळांची साठवण करावी. फळांची काढणी झाल्यानंतर फळांची पिकण्याची अवस्था सुरु होते. फळांमध्ये अनेक रासायनिक प्रक्रिया सुरु होतात, आणि फळे नसण्याची प्रमाणातही वाढ होते. फळांची काढणी शक्यतो कडक ऊन नसताना म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी करावी, फळे काढल्यानंतर सावलीत कोरड्या आणि हवा खेळती राहील अशा ठिकाणी ठेवावीत, फळे साठविताना प्रतवारी करून साठवावीत, नासलेली, खराब फळे वेगळी करून ठेवावीत अशाप्रकारे काळजी घेतल्यास नुकसान टाळण्यासाठी मोठ्याप्रमाणत मदत होईल.

वाहतूक आणि विक्री पद्धत

फळांची विक्री करण्याचे काम अत्यंत महत्वाचे आहे. फळांची काढणी आटोपल्यानंतर साठवण आणि वाहतूक जेवढी कमी करता येईल आणि विक्री जेवढी लवकर करता येईल तेवढा जास्त फायदा होतो पिकलेल्या फळांपेक्षा अपक्व फळांची वाहतूक सोपी असते,तसेच फळांचे नुकसानही टाळण्यासाठी मदत होते. फळांची वाहतूक कमी वेळात आणि सोपी झाली तर साठवण करण्यास कमी अडचणी येतात. फळांची विक्री जाहीर लिलावाने किंवा थेट पद्धतीने करतात. व्यापारी फळांची खरेदी करून कमिशन पद्धतीने किंवा ठोक भावाने अथवा किरकोळ भावाने विकण्याची प्रथा आहे. फळांची विक्री झाल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त कालावधी लागतो. संपूर्ण व्यवहारामध्ये सचोटी आणि हातोटी महत्वाची आहे. 

सौरभ सुभाष केदार, प्रा. प्रेरणा अभंग, प्रा. अश्विनी घाडगे.

कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालये,लोणी