![]() |
मिरची उत्पादन तंत्रज्ञान |
मिरची ही आपल्या रोजच्या आहारातील एक अविभाज्य घटक आहे. मिरचीमध्ये जीवनसत्व क आणि जीवनसत्व अ भरपूर प्रमाणात आहेत. तिखटपणा आणि स्वाद यामुळे मिरची हे महत्वाचे मसाल्याचे पीक आहे. वाळलेली लाल मिरची, मिरची पावडर इत्यादी प्रकारे मिरचीची साठवण आणि वाहतूक करता येत असल्यामुळे मिरची दूरच्या बाजारपेठेत पाठविता येते.
तिखटपणा हा मिरचीच्या सालीमध्ये आणि बियांना जोडणाऱ्या तंतूमध्ये असलेल्या कॅप्सिसीन या द्रव्यामुळे येतो तर पिकलेल्या मिरचीला लाल रंग हा कॅप्सेन्थीन या द्रव्यामुळे येतो. तिखटाचे प्रमाण जातीप्रमाणे बदलते. वाळलेल्या मिरचीमध्ये जास्तीतजास्त १.५ % तिखटपणा आढळतो. ओली लाल मिरची वाळविली असता मिरचीचे वाण आणि प्रकारानुसार सरासरी १५ ते ३० % वाळलेली मिरची मिळते. मिरचीच्या फळामध्ये साल ४५ ते ४९ %, बिया ४० ते ४८ % आणि देठ ६ ते ७ % असतो.
हवामान आणि जमिन : उष्ण आणि दमट हवामानात मिरचीची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. जास्त पाऊस आणि ढगाळ हवामानात फुलाची गळ होते, पाने आणि फळे कुजतात. मिरचीच्या झाडाची आणि फळांची वाढ २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्पादनही भरपूर येते. बियांची उगवण १८ ते २७ अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते.
पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत मिरचीचे पीक चांगले येते. ओल धरुन ठेवणाऱ्या जमिनीत मिरचीचे कोरडवाहू पीक घेता येते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेद्रिय खते वापरल्यास मिरचीचे पीक चांगले येते. पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मिरचीचे पीक फघेऊ नये. पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम ते भारी काळी आणिपाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी.
लागवडीचा हंगाम :
लाल तिखट मिरचीची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामात करता येते. खरीप हंगामासाठी बियांची पेरणी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून जुलै पर्यत करतात. रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बियांची पेरणी करतात.
उन्नत आणि संकरित वाण :
संकेश्वरी, सिंधुर, पुसा ज्वला, एन.पी-४६ ए, पंत सी-१, मुसळवाडी सिलेक्शन, पुसा सदाबहार, अग्निरेखा, फुले ज्योती, फुले सूर्यमुखी, फुले मुक्ता, जंयती,कोकोण कीर्ती, तेजस
रोपे तयार करणे : मिरचीच्या एक हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी एक ते दीड किलो बी लागते. बियांची पेरणी करण्यापुर्वी बियांना १ किलोला२ ग्रॅम या प्रमाणात थायरम किवा कॅपटान हे बुरशीनाशक चोळावे. यामुळे बियापासून उदभवणाऱ्या रोगांना प्रतिबंध होतो.
जिरायती पिकासाठी सपाट वाफ्यात रोपे तयार करतात. बागायती पिकासाठी गादीवाफ्यावर रोपे तयार केली जातात. गादीवाफे तयार’ करण्यासाठी जमिन नांगरून आणि कुळवून भूसभूसीत करावी. जमिनीत दर हेक्टरी १२ ते १५ टन शेणखत मिसळावे. नंतर २५ फुट लांब, ४ फुट रूंद आणि १० सेटिंमीटर उंच आकाराचे गादीवाफे तयार करावेत. एक हेक्टर लागवडीसाठी मिरचीची रोपे तयार करण्यासाठी अशा आकाराचे १५ गादीवाफे लागतात.
लागवड पद्धती : मिरचीच्या लागवडीसाठी जमिन खोल नागरून घ्यावी. नागरणी नंतर उभ्या आडव्या पाळ्या देऊन भूसभूसीत करावी. कोरडवाहू पिकासाठी हेक्टरी ९ ते १२ टन आणि बागायती पिकासाठी १५ ते २० टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे उंच आणि पसरट वाढणाऱ्या जातीची लागवड ६० x ६० सेटिंमीटर अंतरावर आणि बुटक्या जातीची लागवड ६० x ४५ सेटिंमीटर अंतरावर करावी.
रोपाच्या लागवडीसाठी ६ ते ७ आठवडे वयाची १५ ते २० सेटिंमीटर उंचीची रोपे निवडावीत. ढगाळ वातावरणात किवा सध्याकाळच्या वेळी रोपांची लागवड करावी. प्रत्येक ठिकाणी एकच जोमदार रोप लावावे. रोपांची लागवड सपाट वाफ्यातून किवा सरी वरंब्यावर करावी. जमिन समपातळीत नसल्यास सरी वरंबा पद्धत सोईची असते. रोपे वाफ्यातून काढल्यानंतर लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे १० लिटर पाण्यात १५ मिलीलीटर मोनोक्रोटोफॉस अधिक २५ ग्रॅम डायथेन एम-४५ अधिक ३० ग्रॅम गंधक मिसलेल्या द्रावणात बुडवून लावावे.
खते आणि पाणी व्यवस्थापन : वेळेवर खते दिल्यामुळे मिरचीची पिकाची जोमदार वाढ होते. साधारणपणे मिरचीच्या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि ओलिताच्या पिकासाठी दर हेक्टरी १५० किलो नत्र, १२० किलो स्फुरद आणि १२५ किलो पालाश द्यावे. यापैकी स्फुरद आणि पालाशाची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीनंतर ३० दिवसांनी बांगडी पध्दती द्यावी.
मिरचीच्या बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त किवा कमी पाणी देऊनये. झाडे फुलावर आणि फळावर असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
रोप लावणीनंतर १० दिवसांनी शेतात रोपाचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड शेताला हलके पाणी द्यावे. त्यानंतर ५ दिवसांच्या किवा एक आठवड्याच्या अंतराने पाणी द्यावे. साधरणत हिवाळ्यात १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. तर उन्हाळ्यात ६ ते ९ दिवसांनी पिकाला पाणी द्यावे. ठिबक सिंचन पध्दतीनेही पाणी देता येते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनब वाढते.
आंतरपिके : मिरची पिकामध्ये सुरुवातीच्या एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कमी दिवसांत येणारे कोथींबीर, पालक, मेथी किवा गाजर, मुळा यासारखीपिके घ्यावीत. पण मिरचीची लागवड बिजोत्पादनासाठी केली असल्यास आंतरपिके घेऊ नयेत. काही भागात मिरची पिकामध्ये कांद्याचे ` पीक घेतात.
आंतर मशागत : शेतातील मिरचीच्या रोपांची लागवडीनंतर २० ते २५ दिवसांनी पहिली खुरपणी करावी. त्यानंतर तणाच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणरहित ठेवावे. मिरचीच्या खरीप पिकाला रोपांच्या लागवडीनंतर २ ते ३ आठवड्यांनी मातीची भर द्यावी. बागायती पिकाच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनं
दोन महिन्यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी. पावसाळ्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
संजीवकाचा वापर :
मिरची पिकामध्ये सुरुवातीस फळ धारणेच्या वेळी तापमान जास्त असल्यास फुलांची आणि लहान फळांची गळ होते. या वेळी पिकाला पाणी दिल्यामुळे जमिनीचे आणि वातावरणातील तापमान कमी होऊन फुलांची गळ होते. मिरचीच्या फुलांची गळ कमी करण्यासाठी १० ते २० पीपीएम तीव्रतेचे एन.ए.ए या संजीवकाचा फवारणी करावी.
कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार १० १० ते २० पीपीएम एन.ए.ए ची फवारणी लागवडीनंतर ५० आणि ७० दिवसांनी केल्यास फुलगळ,फळगळ कमी होऊन मिरचीच्या उत्पादनात वाढ होते.
काढणी आणि उत्पादन :
भाजीसाठी पूर्ण वाढलेल्या पण हिरव्या मिरचीची काढणी करतात तर वाळलेल्या मिरच्यासाठी पूर्ण पिकून लाल झालेल्या मिरच्यांची तोडणी करतात.
महाराष्ट्रात लांब हिरव्या मिरच्याची तोडणी साधरणपणे रोपाच्या लागवडीनंतर ५० ते ६० दिवसांनी सुरु होते. हिरव्या मिरचीसाठी फळांची तोडणी देठासहित १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी.
बागायती हिरव्या मिरचीचे दर हेक्टरी सरासरी उत्पादन ७० ते ९० क्विटल येते. ओलिताच्या वाळलेल्या मिरचीचे उत्पादन ६ ते ७ क्विटल येते.
महत्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण
मिरचीचे अपेक्षित उत्पादन येण्यासठी रोग आणि किडींचे नियंत्रण करणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. मिरचीच्या पिकावर प्रामुख्याने फुलकिडे,कोळी आणि मावा या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.
१.फुलकिडे : फुलकिडे हे कीटक आकाराने अतिशय लहान असून त्यांची लांबी एक मिलीमीटर पेक्षा कमी असते. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. हे कीटक पाने खरवडून त्यातून बाहेर येणाऱ्या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पानांच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हे कीटक खोडातील रसही शोषतात त्यामुळे खोड कमजोर बनते, पाने गळतात आणि झाडे सुकतात. याशिवाय बोकड्या या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होतो. या किडीच्या उपद्रवामुळे मिरचीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
उपाय : या किडीचा बंदोवस्तसाठी रोपलावणीपासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने ८ मिलीलीटर १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे किवा रोप लागवडीनंतर १० दिवसांनी मोनोक्रोटोफॉस १५ मिलीलीटर १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
२. मावा : मावा हे कीटक मिरचीच्या कोवळ्या पानांतील आणि शेड्यांतील रस शोषण करतात, त्यामुळे नवीन पाने येणे बंद होते.
उपाय : मिरचीच्या लागवडीनंतर १० दिवसांनी मोनोक्रोटोफॉस १५ मिलीलीटर १० लीटर पाण्यात मिसळून त्याची रोपांवर फवारणी करावी.
महत्वाच्या रोग आणि त्यांचे नियंत्रण :
१.रोपांची मर : हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. गादीवाफ्यात किवा लागवडीनंतर रोपांना बुरशीची लागण होते. लागण झालेली रोपे निस्तेज आणि होतात. रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोप कोलमडते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॅापर आक्सिक्लोराईड मिसळून हे द्रावण गादीवाफे किवा रोपाच्या भोवती ओतावे.
२.भुरी : भुरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भुकटी दिसते.या रोगाचा प्राद्रूर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.
उपाय : भुरी रोगाचा प्राद्रूर्भाव दिसताच ३० ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक किवा १० मिलीलीटर कॅराथेन १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या आतराने दोन फवारण्या करावव्यात
प्रा.कु. घाडगे अश्विनी गणपती, प्रा. प्रेरणा भास्कर अभंग, सौरभ सुभाष केदार
No comments:
Post a Comment